Raajmat News

Raajmat News

Share

11/12/2022

नव्या महामार्गांचे स्वागतच आहे, पण...

© संजीव ओक

देशभरात नवनवे महामार्ग उभारले जात आहेत. रस्तेबांधणीचे विक्रम नितीन गडकरी यांच्या नावे होत आहेत. मात्र, जुन्या रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्याचबरोबर पुणे-बेंगळुरू तसेच मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या दहा वर्षांहूनही अधिक काळ रेंगाळलेले आहे. गेल्या महिन्यात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांदणी चौकातील वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर आता चांदणी चौकात नव्या मार्गिका उभारल्या जात आहेत.
नवीन महामार्गांची घोषणा करणे, त्यासाठी निधी मंजूर करणे हे गडकरी यांचे नेहमीचे काम झाले आहे. त्याचबरोबर मर्सिडिझ बेंझ, टोयोटासारख्या अलिशान गाड्यांच्या इलेक्ट्रिक मॉडेल्समधून ते स्वतः फिरतात, त्या गाड्या घेण्याचे आवाहन करतात. पारंपारिक इंधनाला पर्याय म्हणून इथेनॉल वापर तसेच निर्मितीसाठी प्रोत्साहन देतात. हे सर्व करत असतानाच, अव्यवहार्य असा मोटारमधील सर्वांसाठी सीट बेल्ट अनिवार्य करण्याचा निर्णयही ते घेतात. गडकरी यांना पंतप्रधानपद खुणावते आहे, हे कधीही लपलेले नाही. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नावाला त्यांनीच विरोध केला होता. अर्थातच भाजपच्या शिर्षस्थ नेतृत्वाने गडकरी यांच्या मताला किंमत न देता मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करत निवडणुका लढवल्या. त्यानंतर जे झाले, ते इतिहास आहे.
देशात चांगले रस्ते हवेत, यात कोणतेही दूमत नाही. मात्र, जे रस्ते बांधले आहेत, त्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काय, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित राहतो. मुंबई-बेंगळुरू महामार्ग तसेच मुंबई-गोवा महामार्ग यासोबतच दिल्ली-चंदिगड, मुंबई-अहमदाबाद या मार्गांची अवस्था देखील बिकट आहे. चांगले रस्ते पाहिजे असतील, तर टोल द्यायलाच हवा, ही नितीन गडकरी यांची भूमिका आहे. त्यांनी संसदेत बोलतानाही त्यांच्या या भूमिकेचा उच्चार केला आहे. मात्र, चांगले रस्ते याचा त्यांना विसर पडलेला दिसून येतो. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग असो वा पुणे-सातारा रस्ता असो. सर्वच रस्त्यांची अवस्था दयनीय अशीच झालेली आहे. चांदणी चौकाच्या दुरवस्थेचे पडसाद राज्यभरात उमटले. तेथील पूल पाडल्याची घटना समाज माध्यमांमुळे जगभरात चेष्टेचा विषय झाली. टोल नेमका कशाबद्दल घेतला जातो, हेच प्रवाशांना समजत नाही.
सिमेंटचा रोड उभा करणे, हे तसे फारसे कठीण काम नाही. मात्र, या रस्त्यामुळे भविष्यात काही समस्या तर निर्माण होणार नाही ना, याची कोणतीही काळजी घेतलेली दिसून येत नाही. पुणे-सातारा रस्त्याचे काम तब्बल बारा वर्षे रेंगाळले आहे. मुंबई-गोवाचे तेच. जुने रस्ते वाहनचालकांसाठी मृत्यूचे सापळे बनत असताना, नवे महामार्ग बांधण्याचा अट्टहास कशासाठी? हाच कळीचा प्रश्न आहे.
सांगली, कोल्हापूरला फटका
मुंबई-बेंगळुरू महामार्गाचे काम झाल्यानंतर कोल्हापूर, सांगलीला दरवर्षी पूराचा फटका बसतो आहे. सिमेंटच्या रस्त्यामुळे महामार्गाची उंची जवळपास दोन फूटाने वाढली. कोल्हापूर अक्षरशः विभागले गेले असून, जून महिन्यातच पंचगंगेचे पाणी पात्र सोडून शहरात घुसत आहे. सांगली-कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांना दरवर्षी पूराचा तडाखा बसतो आहे. महामार्गामुळे कोल्हापूरात पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याचे समितीनेही मान्य केलेले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे-बेंगळुरू रस्ता माण-खटाव तालुक्यातून नेण्याचा प्रस्ताव आहे.

© संजीव ओक

#राजमत

11/12/2022

स्पष्ट असूनही संयत, असला
रोखठोक तरी आक्रमक नाही. एखाददुसरी शेलकी शिवी असली, तरी भांडणाची खुमखुमी
नाही. विश्वातल्या घडामोडींची खबरबात असली, तरी केवळ माझ्याकडेच उपाय आहे, असा अनाठायी दावाही नाही.
आज राजकारणाच्या धुमश्चक्रीतून नेमकं आणि नेटकं विश्लेषणासहित वाचकांपुढे मांडणारे वरिष्ठ पत्रकार श्री. संजीव ओक. राजमत न्यूजचे मुख्य संपादक.
पत्रकारितेतला २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, महाराष्ट्राच्या मातीशी आत्मीयता जपणारा आणि जोपासणारा व्रतस्थ, अजातशत्रू सुहृद. सकारात्मक विचारांचा उगाता आणि प्रेरक मित्र.
असा बहुगुणी सद्सद्विवेकी पत्रकार राजमत न्यूजचा मुख्य संपादक आहे, याचा आम्हा सर्वांनाच अभिमान आहे.
- टीम राजमत न्यूज

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Pune