Pronews
09/03/2021
कष्टाळू स्वाभिमानी रिक्षाचालक महिलांना प्रोत्साहन द्या : सुधीर हिरेमठ
आरपीआय (आठवले) महाराष्ट्र प्रदेश वाहतूक आघाडीचा अनोखा उपक्रम
पिंपरी (9 मार्च 2021) : रिक्षा चालवून प्रवाशांना सेवा सुविधा देणे हे खूप कष्टाचे आणि जोखमीचे काम आहे. आपल्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक महिला स्वाभिमानाने आणि ताठ मानेने हे खडतर काम करीत आहेत. याचा आपल्याला अभिमान आहे. अशा होतकरू आणि कष्टाळू स्वाभिमानी महिलांचा समाजातील विविध स्तरातून सन्मान झाला पाहिजे व त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले.
महिलादिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील महिला रिक्षाचालकांना आरपीआय (आठवले) महाराष्ट्र प्रदेश वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिज शेख यांच्यावतीने निवडक महिलांना साडी, चप्पल आणि प्रथमोपचार किट देऊन सन्मान करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या हस्ते महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला. रिक्षाचालक कविता मैंदाळ यांनी रिक्षा चालवून आपल्या मुलाला डॉक्टर व मुलीला अभियंता असे उच्च शिक्षण दिले, याबद्दल मैंदाळ आणि पिंपरी चिंचवड शहरातील पहिल्या महिला रिक्षाचालक सविता आव्हाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
आरपीआय (आठवले) राष्ट्रीय महिला अध्यक्षा सीमा आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (8 मार्च) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुमताज शेख, माजी स्वीकृत प्रभाग सदस्य हमीद शेख, आरपीआय वाहतूक आघाडी शहराध्यक्ष राम बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते गोपाल अगरवाल, बशीर सय्यद, मेघा आठवले, गंगाताई धेंडे, मनीषा प्रधान, ललिता बनसोडे, फिरोज पाटील, असिफ शेख, शाम उनवणे, प्रवीण चौधरी, जॉर्ज फ्रान्सीस, युवराज भास्कर, अमोल ढमाळे, सचिन गायकवाड, सुनील शिंदे, इब्राहिम शेख, आनंद देवकर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रातराणी महिला रिक्षा स्टॅण्डच्या रिक्षा चालक सविता आव्हाड, जयश्री शिरसाठ, स्मिता शिरसाठ, लक्ष्मी वैरागे, कविता सकट, जनाबाई वैरागे, संगीता जाधव, हिना तांबोळी, रोहिणी वाघमारे, राणी मांडगे, सविता मिसाळ, प्रज्वला आव्हाड, सुनीता डफ आदी उपस्थित होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रातराणी महिला रिक्षा स्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजक अजिज शेख यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक महिला कुटुंबाच्या चरितार्थासाठी रिक्षा चालक म्हणून काम करीत आहेत. यामध्ये बहुतांश महिला विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आहेत. अशा गोरगरीब कुटुंबातील महिलांना रिक्षा चालविताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. रिक्षातील प्रवासी तसेच टवाळखोरांकडून देखील त्यांना त्रास सहन करावा लागतो. अशावेळी पोलिस प्रशासनाबरोबरच वाहतूक आघाडीचे कार्यकर्ते मदतीला धावून येतील. वेळप्रसंगी अशा टवाळखोरांचा सामना करण्यासाठी चप्पलचा वापर करा. तसेच रस्त्यात एखादा अपघात घडल्यास रिक्षात असणा-या प्रथमोपचार पेटीचा उपयोग करून पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन अजिज शेख यांनी केले.
-------------------
09/03/2021
वायसीएम रुग्णालयात अमिलोब्लास्टोमा या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया
गोर-गरीब रुग्णांना उपचारासाठी वायसीएम ठरले वरदान
पिंपरी (9 मार्च 2021) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात लाखो गोर-गरीब रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. पुणे जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील रुग्णांनी आतापर्यंत या सेवेचा लाभ घेतला आहे. येथील उपचारांमुळे अनेक रुग्ण दुर्धर आजारातून मुक्त झाले आहेत. तसेच दहा लाखात 1.7 टक्के रुग्णांना जबड्याचा अमिलोब्लास्टोमा हा दुर्मिळ आजार होतो. या आजाराची 55 वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती, वायसीएम रुग्णालयाचे दंत चिकित्सक विभागप्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांनी दिली.
रुग्णालयात विविध अत्याधुनिक उपचार व शस्त्रक्रिया विभाग आहेत. यापैकी दंत चिकित्सा विभागात फेब्रुवारी महिन्यात अमिलोब्लास्टोमा या दुर्मिळ आजारावर रुग्णालयाच्या दंतचिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांनी अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रियेनंतर 55 वर्षीय महिलेला जीवदान मिळाले असून एक महिन्यांच्या उपचारानंतर ती आता ठणठणीत बरी झाली आहे. शाबीरा शेख (वय 55 राहणार इंद्रायणी नगर भोसरी) या महिलेला सहा वर्षांपूर्वी खालच्या जबड्याचा दुर्धर आजार झाला होता. अनेक खासगी रुग्णालयात उपचार घेतले परंतु त्यावर खात्रीशीर उपचार झाला नाही. जबड्याचे हाड कुजत चालल्याने दाताने अन्न चावतानाही वेदना होऊ लागल्या. शेख याना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेल्या असता शस्त्रक्रियेसाठी एक लाख रुपयांचा खर्च सांगितला. त्यांचे पती खासगी सफाई कर्मचारी म्हणून अल्प मानधनावर काम करतात. त्यामुळे हतबल झालेल्या शेख यांच्या पतीने वायसीएम रुग्णालयातील दंतचिकित्सा डॉक्टरांकडे उपचार घेण्याचा निर्णय घेतला. तपासणीनंतर दंत चिकित्सा विभागप्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांनी जबड्याची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी महिन्यात शेख यांच्या जबड्याची शस्त्रक्रिया करून खालच्या जबड्याची कुजलेली हाडे काढून घेतली व टायटेनियम धातूच्या पट्टीचे रोपण केले. त्यानंतर रुग्णालयात एक महिना उपचार केले. शेख सध्या ठणठणीत असून त्यांना कोणताही त्रास नाही. असा आजार दर दहा लाखात 1.7 टक्के लोकांमध्ये आढळतो आणि हा आजार स्थानिकदृष्ट्या घातक असल्याने जबड्याचे हाड कुजत जाते. त्यामुळे दुर्मिळ आजारावर कोणताही खर्च न होता यशस्वी उपचार झाल्याने शेख यांनी समाधान व्यक्त करून उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले. दंत चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांच्या समवेत डॉ. दीपक पाटील, डॉ. श्रीनिवास, डॉ. अजिंक्य, डॉ. श्रद्धा म्हस्के यांनी सहकार्य केले. यासाठी डॉ. तुषार पाटील पॅथॉलॉजी विभागप्रमुख आणि अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
-------------------------
Happy womens day
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pimpri
411018