Manisha Jadhav
02/01/2026
नवीन वर्ष...नवा उत्साह...😎जुन्या आठवणींना उजाळा..आणि नवीन वर्षाचे स्वागत..🥳
आपल्या आप्तजणांच्या शुभेच्छा...आणि खूप सारं समाधान..🌹🌹वर्षाच्या सुरुवातीला का होईना पण आवर्जून सगळ्यांची काढलेली आठवण...प्रेमाची साठवण आणि मायेचा ओलावा😘 रोज भेटी होत नसल्या तरी कधीतरी अशा सुखद प्रसंगी प्रेमाने केलेली चौकशी आयुष्यात खूप सारा आनंद पेरून जाते.😊ऋणानुबंधांच्या या सुंदर क्षणांनी आपलं सर्वांच आयुष्य आनंद आणि उत्साहाने बहरून जावं..आणि हजारो पावलांनी सुख आपल्या आयुष्यात यावं हीच या नूतन वर्षाच्या सुरुवातीला मंगल कामना करते 🙏
तुमच्यासारखी गोड माणसं माझ्या संपर्कात... आयुष्यात....आणि सुख दुःखात बरोबर आहेत हेच माझं भाग्य...🙏 नात्यातला...मैत्रीचा...आणि आपुलकीचा हा गोडवा सदैव बरोबर राहील हीच अपेक्षा आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..... 🌹🌹
मनिषा ठाणगे जाधव
13/12/2025
"आज्जी चल आपला एक फोटो काढू....
आता बाई माव्हा म्हातारीचा काय धड फोटू यायचाय ग...अस म्हणत म्हणत ती पटकन डोक्यावरचा पदर सावरायची,गळ्यातले दागिने वर काढायची आणि अगदीच छान लुक द्यायची...आणि स्वतःचा फोटो पाहून खूप खुश व्हायची.
दिसायला साधी भोळी,बोलण्यात खूपच भाबडेपणा...तोंडांत सारख्या शिव्या... पण मनाने मात्र कमालीची मायाळू होती.खाण्या पिण्याची फारच शौकीन....कधी तोंडाला चव नसली की थालीपीठ करणार... मॅगी करून खाणार.तीच बनवणं सुद्धा छानच असायचं.लहान असताना मी बऱ्याच वेळा सुट्टीत झापात या आज्जीकडे यायचे.आज्जी बाबांचं भांडण फारच इंट्रेस्टिंग असायचं.तिला राग आला की ती शिव्यांचा भडिमार करायची पण काळजी सुद्धा तितकीच घ्यायची.
एकदा शेतात कांदे लागवड चालू होती.संध्याकाळी सगळे दमून भागून आले होते.बाबा नेहमीप्रमाणे ओट्यावर झोपले आणि आज्जी जेवणाच्या तयारीला लागली.बाहेरून अचानक हाक आली...हिरे.....(बाबा आज्जीला हिरे म्हणायचे) त्यांची हाक ऐकून ही संतापली ....म्हणली माझा इथं जीव चाललाय आण हा डंगऱ्या का माह्या नावाने बोंबलतोय...मग बाबा म्हणले आग आज शेवते करती का खायला...
खर तर एवढी दमून आलेली आज्जी आणि तिच्याकडे शेवते करण्यासाठी पीठ सुद्धा नव्हत पण नवऱ्याची आवड जपण्यासाठी तिने चिमणीच्या प्रकाशात हुलगे निवडून ते जात्यावर दळून त्याचे शेवते वळले होते.
त्या काळी झाप माणसांनी गजबजलेला होता.सुट्टीत सगळी नातवंड येथे जमायची.या सगळ्यांची आज्जी मायेनं विचारपूस करायची.दारावरून जाणाऱ्या प्रत्येकाला "भाऊ येणा...भाकर खा ना.. आर् चहा तरी पे..." अस आग्रहाने आणि मायेने बोलायची.तिच्या बोलण्यात कमालीची मवाळकी होती.
ती गेली आणि नकळत तिच्या आठवणी मनात दाटून आल्या.मी जेमतेम १० वर्षाची असेल तेव्हा तिला पहिल्यांदा भेटले.खर तर ही माझ्या आईची मावशी पण सख्या आज्जीपेक्षा खूप जास्त प्रेम करत होती.आता तिच्या भावकीत असले तरी आमचं आज्जी आणि नातीचं गोड नातं आम्ही दोघींनीही जपलं होत.मला बोलताना "माही मनिषा किती काम करती"अस ती नेहमी म्हणायची.गावाला गेल की सगळं काम आवरून मी थोडा वेळ तिच्याजवळ निवांत बसायची.तिच्या बरोबर बोलून फार छान वाटायचं.मी परत मुंबईला जायला निघाले की ती खूप रडायची म्हणायची "बाई माझं लई दुखतंय...तू परत येशील तोपर्यंत मी मरून जाईल" सगळे हसायचे. ..म्हणायचे "काकू काय काळजी करू नको..तू काय एवढ्यात मरत नाही."मग परत एक प्रश्न असायचा "बघू ना मी मेल्यावर किती रडती"
तिचं बरंच आयुष्य शेतात काबाडकष्ट करण्यात आणि गाई गुरांची सेवा करण्यात गेल.बऱ्याच वर्षांपासून आजारी असायची.तिची अनेक ऑपरेशन्स झाली होती.एवढ त्रासदायक आयुष्य असून सुद्धा तिनं जगण्याची जिद्द सोडली नाही.कितीतरी वेळा ती मृत्यूशी झुंज देऊन सहिसलामत परत आली होती.
पण गेल्या काही दिवसांत मात्र तिला त्रास असह्य झाला होता.सारखं म्हणायची "देव मला का नाही नेत."
अखेर देवाने तिची प्रार्थना ऐकली. आणि आपल्या सगळ्यांना सोडून ती कायमची देवाघरी गेली.ती गेल्याचं दुःख तर झालंच पण त्याहीपेक्षा ती या जीवघेण्या मरण यातनांतून मुक्त झाल्याचं समाधान अधिक वाटलं.
जाधवांच्या इतिहासातील अजून एक सुवर्ण पान गळून पडले😔
आपल्या सर्वांची लाडकी कौसाई काकू आणि माझ्या झापातल्या आज्जीला दुःखद अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
मनिषा ठाणगे जाधव
29/10/2025
"नावात काय आहे.. ?"
प्रसिद्ध नाटककार शेक्सपिअरचं हे विधान जेव्हा माझ्या वाचनात आलं तेव्हा त्याचा शब्दशः अर्थ घेऊन आपलं नाव "मनिषा " का ठेवलं असावं हे जाणून घेण्याची उत्सुकता माझ्या मनात निर्माण झाली. खर तर हा त्याच्या "रोमियो अँड जुलीएट "या नाटकातील एक संवाद होता.हे वाक्य त्याकाळी बरच प्रसिद्ध झालं होतं. मला एक कुतूहल निर्माण झालं की माझ्या नावाचा अर्थ काय असेल ? हे नाव कोणाला आणि कसे सुचले असेल?
लहानपणापासून मला प्रश्न विचारायची खूप आवड होती.कारण कुठल्याही गोष्टीचा खोलवर जाऊन विचार करायची सवय असल्याने त्या अनुषंगाने मला नेहमी बरेच प्रश्न पडायचे.आणि मग त्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्याशिवाय मला काही केल्या चैन पडत नसे.माझ्या सर्व प्रश्नांची अचूक आणि दर्जेदार उत्तरे देणारी घरात एकमेव विद्वान व्यक्ती होती ती म्हणजे माझी आई.मला शांत कसं करायचं हे आईला चांगल्या प्रकारे माहीत होतं.तशी माझी जन्मापासून अनेक नावे होती.जसजशी वाढत गेले तसतशी काही नावं पडत गेली.आणि आठवणींच्या रुपात ती कायम सोबत राहिली.
माझ्या नावाविषयी बोलताना आई म्हणाली...
"खर तर मनिषा हे तुझं दुसरं नाव आहे जे शाळेत घालण्यापूर्वी आम्ही ठेवलं होतं.तुझं पाळन्यातलं नाव तर "बाळी" होतं.
आणि मग सुरू झाली माझ्या नावाची गमतीदार कहाणी...
त्याकाळच्या पुरुषप्रधान संस्कृतीत पहिली मुलगी झाली तरी पदरी थोडं नैराश्य पडायचं.नशिबानं पहिल्या मुलीच्या पाठीवर जर दुसरा मुलगा झाला तर त्या बाईंचा संसार झाला आता काय काळजी राहिली नाही असे सर्वजण म्हणायचे.कारण ज्या बाईला पहिली मुलगी व्हायची त्यानंतर जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत कितीही मुली झाल्या तरी तिची बाळंतपणं थांबत नसायची आणि शेवटी मुलगा नाहीच झाला तर घरात सर्वानुमते त्या पुरुषाच्या दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव पास होत असे.अशा वेळी संबंधित महिला आणि तिच्या आई वडिलांना काय वाटेल हा विचार सुद्धा कोणाच्या मनात येत नसे.
मुलगी म्हणजे परक्याचं धन आणि मुलगा म्हणजे वंशाचा दिवा,म्हातारपणाची काठी,घराण्याचा पदसिद्ध वारस आणि अंतीम समयी पाणी पाजून मोक्षाचं कारण बनणारा समाजमान्य घटक मानला जाई. म्हणून मुलगा नाही तर मोक्ष नाही असा कदाचित सर्वांचा समज असावा.
याशिवाय त्याकाळी महिलांना सासरी फार जाच व्हायचा तोच जाच पुढे "सासुरवास" या नावाने प्रचलित झाला.छोट्या मोठ्या कारणांवरून महिलांचा सासरी अतोनात छळ होत असे.प्रसंगी पदोपदी त्यांना माहेरचा रस्ताही दाखवत असत.अशावेळी जेव्हा तिला मुलगा व्हायचा तेव्हा तीचं थोडबहुत कौतुक होऊन तिचं सासरी नांदनं निश्चित व्हायचं.थोडक्यात काय तर घरात मुलगा जन्माला येणं हे फार गरजेचं आणि तितकंच महत्वाचं देखील होतं.
अशा पुरुषप्रधान समाजात माझ्या आईच्या पदरात आधीच एक मुलगी असताना किमान दुसरा तरी मुलगा व्हावा अशी तीच्या आई वडिलांची अपेक्षा असणं हे कालानुरूप रास्त होतं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होत.
बहिणीच्या जन्मानंतर साधारण 3 वर्षांनंतर आईच्या पोटात परत एक जीव आकार घेऊ लागला.अर्थात यावेळी तिच्या पोटात मी होते.दुर्दैवाने नेमकं त्याच वेळी कुटुंबात काही वैयक्तिक कारणामुळे मोठ्या प्रमाणात वितुष्ट निर्माण झाले होते.आणि पुढे ते विकोपाला गेले.
काही दिवसांतच आईने मला जन्म दिला.आणि सर्वजण मुलाची वाट पाहत असताना "दुसरी" मुलगी झाली म्हणून दोन्ही घरात असंतोष पसरला.
खरं तर घरात मुल जन्माला येणं ही किती आनंदाची गोष्ट आहे.पण मी मात्र मुलगी असल्याने माझे कुठलेही कोडकौतुक किंवा सोहळे झाले नाहीत.उलट रंगाने मी खूप काळी असल्याने माझ्या वाट्याला खूप अवहेलना आली.आज्जी नेहमी म्हणायची हिचा पायगुण चांगला नाही. ही कळतोंडी जन्माला आली आणि माणसात माणूस राहिलं नाही.
कुटुंबातील कोणी बघायला आलं नाही म्हणून मग नाव ठेवण्याची जबाबदारी मामाच्या कुटुंबाने घेतली.हिचं नाव काय ठेवायचं हा विषय जेव्हा मामाच्या घरी निघाला तेव्हा आज्जीने रागावून सांगितले की "कुठं लई गोरीपान हाये तीचं नाव ठेवायला...काळी तर हाये...बाळी म्हणत जा तीला." आणि माझ्या आयुष्यातीलं हे पहिलंच नाव मला मामाच्या घरी मिळालं.जे आजही माझ्या वाईट काळाची आठवण म्हणून माझ्या बरोबर आहे.
त्यानंतर मी जसजशी मोठी होत गेले तसतशी मला वेगवेगळी नावं मिळत गेली आणि त्या सर्व नावांचा मी हसत हसत स्वीकार करून ती आजपर्यंत जपून ठेवली आहेत.
काही दिवसांनी परिस्थिती थोडी निवळली आणि आई मला घेऊन माझ्या हक्काच्या घरी गेली. दिसामासाने मी वाढत गेले.मला लहान असताना दुधाची साय खूप आवडायची.घरात काळ्या भोर मडक्यात खरपूस दूध तापायचे आणि माझा डोळा नेहमी साय कधी भेटते त्यावर असायचा.ते मडके जेव्हा साय खरडून खाण्यासाठी माझ्याकडे दिले जाई तेव्हा मी ते शिंपलीने कित्येक वेळ खरडून खात बसायचे.मला दूध फार प्रिय असल्याने सगळे मला मांजर किंवा मनी म्हणायचे आणि मनी म्हणता म्हणता त्याचे रूपांतर "मनिषा" या सुंदर नावात झाले.
लहानपणापासून मी अतिशय उत्साही आणि स्वच्छंदी होते.परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा तिचा हसत हसत सामना करणे मला अधिक पसंत होते.त्यामुळे मी सतत हसतमुख असायचे.मनात नेहमी यायचं माझ्या जन्माने जरी कोणाला आनंद झाला नसला तरी माझे आयुष्य मी सुंदर बनवेल आणि आनंदाने जगेल.माझा हा सतत हसतमुख चेहरा पाहून काही लोकं मला गमतीने सदाफुली म्हणू लागले. हो..आणि मी खरच तशीच होते..सदाफुलीच्या झाडासारखी...बाराही महिने फुललेली... अशा सगळ्या माझ्या नावाच्या गमती आहेत.त्यामुळे "नावात काय आहे..?"या शेक्सपिअर च्या वाक्याचा मी सखोलपणे विचार केला.आणि आजही
अनेकांना नाव विचारल्यावर किंवा नावाविषयी बोलताना "नावात काय आहे.." असे कोणी विनोदाने बोलले तर माझ्या मनात येतं की..."नावात बरंच काही आहे..."
नाव आपली आयुष्य भराची ओळख आहे!
नावात आपली परिस्थिती आहे!
नावात आपले विचार आहेत !
नावात आपला स्वभाव आहे !
नावात आपले कर्तृत्व आहे !
नावात आपल्या आठवणी आहेत!
नावात ज्याने ते ठेवले त्याची कल्पकता आणि भावना आहे!
आपलं दिसणं,हसणं, वागणं सर्व काही नावात आहे!!
एक अमुक नावाची व्यक्ती असा कोणी उल्लेख केला तरी त्याची प्रतिकृती लगेच आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. म्हणून नावात बरंच काही आहे.
तुमच्याही नावाचे असे काही किस्से असतील तर जरूर कमेंट करा.एक वेगळा विषय वाचल्याचा आनंद सर्वांना मिळेल.
मनिषा ठाणगे जाधव
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Bhandup