Puneri Express
विशेष
अखिल विश्वासाठी पसायदान मागणार्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणार्या संत ज्ञानेश्वर माउलींची संजीवन समाधी असलेला पुणे जिल्हा ! साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणार्या संत तुकारामांची जन्मभूमी व कर्मभूमी म्हणजे पुणे जिल्हा ! हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे
जन्मस्थान असलेला पुणे जिल्हा!
संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आणि संत तुकारामांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्विक,पवित्र उर्जा केंद्रच आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरीच्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या पालख्या लाखो वारकर्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
शिवकाळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणार्या संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर ! ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
‘पुणे तिथे काय उणे’ असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हटले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे जगातील मुख्य केंद्र म्हणून हा जिल्हा जोमाने वाटचाल करत आहे.
ऐतिहासिक महत्त्वाचे
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्व-राज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणार्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर झाला. इ. स. १६४१ पासून शिवाजी महाराज व जिजाबाई यांचे वास्तव्य अधिक काळ पुण्यात होते. खेड शिवापूर येथे व पुण्यातील लाल महाल येथे शिवाजी महाराजांचे बालपण व्यतीत झाले. इ.स. १६४५ मध्ये महाराजांनी तोरणा (ता. वेल्हा) किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला. १६४५ ते १६४८ या काळात तोरण्यासह पुणे जिल्ह्यातील कोंढाणा, राजगड व पुरंदर हेही गड छत्रपतींनी हस्तगत केले.पुणे शहरासह सध्याच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर, पुरंदर, भोर, वेल्हे, मावळ व मुळशी हे तालुके शिवकालीन इतिहासात महत्त्वाचे होते.
पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. पेशवाईचे संस्थापक बाळाजी विश्र्वनाथ यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात पेशव्यांचा पुण्याशी प्रत्यक्ष संबंध आला. बाजीराव पेशव्यांच्या १७२० ते १७४० या काळातील उज्ज्वल कारकीर्दीचे केंद्र पुणे हेच होते. बाजीरावांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. ‘शिवाजी राजाने महाराष्ट्राची, तर बाजीरावाने बृहन्महाराष्ट्राची निर्मिती केली’, असे वंग इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात.
थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांच्या काळात (इ.स.१७४०-१७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभिकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. कात्रज तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईच्या काळातील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. १७७४ ते १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. इ.स. १८१८ मध्ये मराठेशाहीचा व पेशवाईचा अस्त झाला. पुढील काळात शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकवला गेला.
समाजसुधारणा व स्वातंत्र्य चळवळीचे देशातील प्रमुख केंद्र - भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा विचार करता पुण्याचे स्थान व भूमिका महत्त्वाची होती. न्यायमूर्ती रानडेंपासून ते एस.एम. जोशींपर्यंत, तसेच लो. टिळकांपासून ते सेनापती बापट यांचेपर्यंत असंख्य स्वातंत्र्य सेनानींचे कार्य उल्लेखनीय आहे. इ.स. १८७१ ते १८९२ या कालावधीत न्यायमूर्ती रानडे पुण्यात होते. सार्वजनिक सभेच्या माध्यमातून (१८७०-७१) त्यांनी मवाळ व नेमस्त राजकारणाला सुरुवात केली. पुण्याचे सार्वजनिक काका (गणेश वासुदेव जोशी) यांच्या सहकार्याने न्यायमूर्ती रानडे यांनी अर्थव्यवस्था व शेती विकास, स्वदेशी पुरस्कार, राजकीय सत्तेत चंचुप्रवेश या माध्यमातून जनजागृती करण्यास पुण्यातून सुरूवात केली. अनेक राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक संस्था स्थापन करून न्यायमूर्ती रानडे यांनी संस्थात्मक जीवनाचा पाया भारतात घातला, यांतील अनेक संस्थांची स्थापना पुण्यात झाली होती हे महत्त्वाचे!
बहुजन समाजाला खर्या अर्थाने आत्मविश्वास दिला तो महात्मा जोतिबा फुले यांनी! महात्मा फुले यांनी पुणे येथे राहूनच जातिव्यवस्थेवर, ब्राह्मण्यावर कठोर प्रहार केले.सामाजिक विषमता निर्मूलनासाठी सत्यशोधक समाजाची १८७३ मध्ये स्थापना करून बहुजन समाजाला कार्यक्रम दिला, व्यासपीठ निर्माण केले. स्त्री-शिक्षण या विषयात त्यांनी केलेले कार्य हे सर्वांत मूलभूत आणि महत्त्वाचे आहे. १८४८ मध्ये जोतिराव फुले यांनी पुणे येथे भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. स्वत:च्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना त्यांनी शिकवून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षिका म्हणून उभे केले. विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यांचे शिक्षण, शेती विकास या क्षेत्रांमध्येही महात्मा फुले यांनी मूलभूत कार्य केले. १८७६ ते १८८२ या काळात ते पुणे नगरपालिकेचे सदस्यही होते. महात्मा फुले यांच्या लेखनातून व कार्यातूनच राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुढे प्रेरणा मिळाली.
सार्वजनिक सभा या महत्त्वाच्या संस्थेच्या स्थापनेत पुढाकार असल्यामुळे पुण्यातील गणेश वासुदेव जोशी यांचे नाव सार्वजनिक काका असे पडले होते. सार्वजनिक काकांनी स्वदेशी तत्त्वाचा प्रचार पुण्यात केला. परदेशी कापडाची होळी त्यांनी पुण्यात घडवून आणली होती. सार्वजनिक काकांनी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र स्वीकारण्याचे धाडस त्या काळात दाखवले होते. त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांनीही स्त्री-विचारवती ही संस्था स्थापन करून महिलांचे संघटन व प्रबोधन करण्याचा प्रयत्न १८७० च्या दरम्यान पुण्यात केला होता. भारतीय राष्ट्रवाद ज्यांनी प्रखरपणे मांडला व भारतातील सर्व स्तरांतील लोकांपर्यंत पाहोचवण्याचा प्रयत्न केला, असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक! यांच्याच काळात पुणे हे राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचे अतिशय महत्त्वाचे केंद्र बनले. वयाच्या दहाव्या वर्षापासून (१८६६ पासून) लोकमान्य टिळक पुण्यात राहत होते. टिळकांचे शिक्षण पुण्यातीलच डेक्कन कॉलेजमध्ये झाले. लोकमान्य टिळक यांनी गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल (१८८०) ची स्थापना केली. पुढील काळात आगरकरांच्या सहकार्याने डेक्कन एज्युकेशन सोसायटीची (१८८४) व त्या अंतर्गत फर्गसन महाविद्यालयाची स्थापना केली.
टिळक -आगरकर यांनी मराठा (इंग्रजी) व केसरी (मराठी) ही वृत्तपत्रे १८८१ मध्ये पुण्यात सुरू केली. या वृत्तपत्रांतील लोकमान्य टिळकांचे अग्रलेख वाचून अनेक तरुण देशभक्त, क्रांतिकारक बनले. या वृत्तपत्रांमुळे इंग्रजी राजवटीविरुद्धचा असंतोष वाढला. लोकमान्य टिळक व पुण्याजवळचा सिंहगड यांचेही एक अतूट नाते होते. अनेक राजकीय, सामाजिक विषयांबाबत (व गणित विषयाबाबतचे) चिंतन-मनन व अभ्यास टिळकांनी सिंहगडावर केला. केसरीतील लेखांच्या प्रेरणेतूनच चापेकर बंधू क्रांतिकारक बनले. दामोदर, वासुदेव व बाळकृष्ण चापेकर यांनी पुण्याचा तत्कालीन कमिशनर रँड या अधिकार्याचा वध केला. १८९७ मध्ये पुण्यात घडलेल्या या घटनेतून संपूर्ण भारतात अनेक क्रांतिकारक निर्माण झाले. पुण्याजवळ चिंचवड येथे चापेकर बंधूंच्या स्मृती स्मारकाच्या माध्यमातून जतन करण्यात आल्या आहेत. लोकमान्य टिळक व आगरकर यांच्यामध्ये ‘सामाजिक सुधारणा आधी की राजकीय स्वातंत्र्य आधी’ असा वाद पुण्यात झाला. यातून बुद्धिप्रामाण्यवादी आगरकर टिळकांपासून वेगळे झाले. आगरकरांनी पुण्यातच ‘सुधारक’ वृत्तपत्र सुरू केले. ‘सुधारक’ मधून आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य, अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध, शिक्षणाचे महत्त्व इ. मुद्यांचा प्रसार केला. तत्कालीन समाजाच्या विरोधात जाताना आगरकरांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.
क्रांतिकारी चळवळीच्या मार्गातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके व हुतात्मा राजगुरू यांचे स्मरण हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा विषय आहे. वासुदेव बळवंत फडके यांचे माध्यमिक शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूल येथे झाले होते. त्यांनी पुणे जिल्हा परिसरात क्रांतिकारकांची संघटना बांधण्याचा प्रयत्न केला होता. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या त्रिकुटातील राजगुरू हे जिल्ह्यातील खेड या गावचे. हुतात्मा बाबू गेनू यांचे मूळ (जन्म) गावही याच जिल्ह्यातील, आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ हे होय. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या राजकीय व सामाजिक चळवळी, व अनेक प्रकारच्या संस्थांची पुण्यात झालेली स्थापना यांमुळे पुण्यात १९ व्या शतकातील पिढ्या घडल्या. पुण्याने अनेक दिग्गजांना घडवले, तसेच असंख्य मान्यवरांनी पुण्याच्या लौकिकात भर घातली. म. गांधी ज्यांना आपले गुरू मानत असे नामदार गोपाळ कृष्ण गोखले १८८५ ते १८९५ या काळात पुण्यात वास्तव्यास होते. त्यांनी फर्गसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन केले, तसेच आगरकरांच्या ‘सुधारक’ वृत्तपत्राच्या इंग्रजी आवृत्तीचे कामही काही काळ पाहिले.
थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे १८९३ ते १८९८या कालावधीत पुण्यात होते. या काळात त्यांनी फर्गसन महाविद्यालयात बी.ए. व एल.एल.बी. (प्रथम वर्ष) चे शिक्षण घेतले. याच काळात त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले, त्यांच्या पुढील जीवनाक्रमाला निश्र्चित दिशा मिळाली. महर्षी शिंदे यांनी (१९०६ मध्ये स्थापन केलेल्या )निराश्रित साहाय्यकारी मंडळी (डिप्रेस्ड क्लास मिशन) या संस्थेची शाखाही पुणे येथे स्थापन केली. तसेच त्यांनी शेतकर्यांचे प्रश्र्न अधोरेखित करण्यासाठी व शेतकर्यांची स्थिती सुधारण्यासाठी अनेक शेतकी परिषदा भरवल्या. त्यांपैकी दोन परिषदा १९२६ व १९२८ मध्ये पुणे येथे आयोजित केल्या. १९३० मध्ये येरवडा जेलमध्ये असताना त्यांनी ‘‘माझ्या आठवणी व अनुभव’’ हा आत्मचरित्रपर पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली.
प्रामुख्याने स्त्री-शिक्षण या विषयात महान कार्य केलेले महर्षी धोंडो केशव कर्वे यांचीही कारकीर्द पुण्यातलीच. १८९१ पासून महर्षी कर्वे फर्गसन महाविद्यालयात सुमारे २३ वर्षे प्राध्यापक होते. बुद्धिमत्ता, कष्ट, कार्यावरची अविचल निष्ठा, व आधुनिक विचार या गुणांच्या आधारे महर्षी (अण्णा) कर्वे यांनी स्त्री-शिक्षण, विधवा पुनर्विवाह, अनाथ बालिकांचे संगोपन या क्षेत्रांमध्ये प्रचंड कार्य केले. १९०७ पासून त्यांनी फक्त महिला व मुलींसाठी शाळा स्थापन करण्यास पुण्याजवळील हिंगणे येथून सुरुवात केली. १९१६ मध्ये हिंगणे येथेच महर्षी कर्वे यांनी स्वतंत्र महिला विद्यापीठाची स्थापना केली. पुढे ह्या विद्यापीठाचे नाव श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एस.एन.डी.टी.) विद्यापीठ झाले. त्या काळात कर्वे यांनी गृहविज्ञान, आरोग्यविज्ञान, परिचारिका प्रशिक्षण असे विषय शिक्षणासाठी ठेवले होते हे विशेष! परिणामी आजच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत हजारो मुली शालेय शिक्षणापासून ते इंजिनिअरिंग, फॅशन डिझायनिंगपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. म. कर्वे १०५ वर्षांचे कृतार्थ आयुष्य जगले. वयाच्या १०० व्या वर्षी १९५८ मध्ये त्यांना भारतरत्नही प्रदान करण्यात आले.
थोर स्वातंत्र्यसेनानी व समाजसेवक सेनापती (पांडुरंग महादेव) बापट यांचेही शिक्षण पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्येच झाले होते. १९२०-२१ मध्ये पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे धरण व वीज प्रकल्पाचे काम चालू झाले होते. या प्रकल्पात शेतकर्यांच्या जमिनी पाण्याखाली जाणार असल्यामुळे सेनापती बापट यांनी १९२१ पासून मुळशीचा सत्याग्रह सुरू केला, त्या लढ्यात त्यांनी शेतकर्यांचे नेतृत्व केले. या लढ्यामुळेच त्यांना सेनापती ही पदवी मिळाली. पुण्यात त्यांनी सार्वजनिक स्वच्छतेचा प्रचार केला. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात ते एक महत्त्वाचे नेते होते.
स्त्री-शिक्षण, स्त्री-मुक्ती या क्षेत्रात कार्य केलेल्या पंडिता रमाबाई यांचे १८८२ नंतर पुण्यात वास्तव्य होते. त्यांनी १८९० मध्ये अनाथ मुली, निराधार, गरीब महिला, परित्यक्ता, विधवा यांच्या निवास-भोजन-शिक्षणासाठी ‘शारदा सदन’ ची स्थापना पुण्यात केली. पुण्याजवळ केडगाव येथेही त्यांनी मुक्तिसदन स्थापन केले होते. १८९७ च्या दुष्काळात मुक्तिसदनात असंख्य दुष्काळपीडित स्त्रिया, मुलींना आसरा देण्यात आला होता.
इतिहासाचार्य विश्र्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म पुण्यातीलच. महाराष्ट्र व मराठी भाषा यांविषयी जाज्वल्य अभिमान असणार्या या झपाटलेल्या संशोधकाने ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या विषयावरील बावीस खंड प्रसिद्ध केले. संशोधन कार्यात सुसूत्रता आणण्यासाठी त्यांनी पुण्यात १९१० मध्ये भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. प्रसिद्ध गणित-तज्ज्ञ व भारतातील पहिले रँग्लर- रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे -यांचेही शिक्षण पुण्यात झाले. पुण्यातील फर्गसन महाविद्यालयात ते अनेक वर्षे प्राध्यपक व प्राचार्य होते. रँग्लर परांजपे काही काळ पुणे विद्यापीठाचे कुलगुरूही होते. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जन्मही पुण्याचाच.
राष्ट्रीय स्वातंत्र्य-चळवळीच्या सर्व महत्त्वाच्या आंदोलनांत पुण्यातील थोर समाजवादी नेते एस. एम. जोशी यांचा सक्रिय सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्र, तसेच आणिबाणी विरोध या आंदोलनांतही त्यांनी पुण्याचे नेतृत्व केले.पुण्यातील पर्वती देवस्थानात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९२९ मध्ये सत्याग्रह केला होता. मुस्लीम सत्यशोधक हमीद दलवाई यांचेही कार्य उल्लेखनीय आहे. श्री. दलवाई यांनी मुस्लीम समाजाचा, प्रामुख्याने महिलांचा विकास या अवघड क्षेत्रात कार्य करण्याचा प्रयत्न पुण्यातून केला. तलाकपीडित मुस्लीम महिलांचे स्वावलंबन, बहुपत्नीत्वास विरोध, धर्मपरीक्षण या अनेक मुद्यांबाबत त्यांनी मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या (स्थापना : १९७०) माध्यमातून कार्य केले. हमाल, भंगार गोळा करणारे, विविध क्षेत्रांतले असंघटित कामगार, रिक्षावाले इत्यादी दुर्लक्षित घटकांना समोर ठेवून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. बाबा आढाव पुण्यातून आजही कार्यरत आहेत. आढाव यांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ हे सूत्र चळवळीच्या माध्यमातून रुजवण्याचा प्रयत्न केला.
ऐतिहासिकदृष्ट्या पुण्यातील येरवडा जेलचे महत्त्वही वादातीत आहे. हे जेल ब्रिटिशांनी १८८० साली बांधून पूर्ण केले. स्वातंत्र्यापूर्वी, तसेच स्वातंत्र्यानंतर आणिबाणीच्या काळात हा तुरुंग कार्यकर्ते, नेते घडवणारे विद्यापीठच बनला होता. सप्टेंबर, १९३२ मध्ये म. गांधी व डॉ. आंबेडकर या ज्येष्ठ नेत्यांमध्ये, या तुरुंगातच एक महत्त्वाचा करार झाला. अनेक तत्कालीन ज्येष्ठ नेत्यांच्या सह्या असलेल्या या कराराला पुणे किंवा येरवडा करार असे संबोधले जाते.
भूगोल
पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ व माहिती पुढीलप्रमाणे
क्र. तपशील संख्या
१ क्षेत्रफळ १५,६४३ चौ. किमी. (महाराष्ट्रात २ रा क्रमांक)
२ लोकसंख्या ७२,३२,५५५ (२००१)
२.१ स्त्रिया ३४,६३,४२७
२.२ पुरुष ३७,६९,१२८
२.३ शहरी ४२,००,८३७
२.४ ग्रामीण ३०,३१,७१८
३ स्त्री - पुरुष गुणोत्तर १००० : ९१९
४ साक्षरता प्रमाण ८०.४५%
४.१ स्त्री ७१.८९%
४.२ पुरुष ८८.३४%
संदर्भ: जनगणना २००१
पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा, दक्षिणेला सातारा, पश्र्चिमेला रायगड जिल्हा तर वायव्येला ठाणे जिल्हा आहे.
पुणे जिल्ह्यातून पुढील नद्या वाहतात. -
भीमा ही जिल्हातील सर्वांत मोठी नदी आहे.भीमेचा उगम भीमाशंकर (ता. आंबेगाव) येथे होतो. इतर नद्या पुढीलप्रमाणे
मांडवी कुकडी मीना घोड भामा
इंद्रायणी पवना मुळा मुठा कर्हा नीरा
पुणे जिल्ह्यात काही छोटी-मोठी धरणे आहेत. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे
क्र नदी प्रकल्प तालुका
१ वेळवंडी (नीरेची उपनदी) भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) भोर
२ अंबी (मुठेची उपनदी) पानशेत (तानाजी सागर) खडकवासला, (मुळशी)
३ मोसी (मुठेची उपनदी) वीर बाजी पासलकर तलाव खडकवासला (मुळशी)
४ मुळा मुळशी धरण मुळशी
५ पवना भीमा प्रकल्पांतर्गत पवना धरण फागण, मावळ
६ कुकडी, घोड कुकडी प्रकल्प, डिंभे धरण चिंचणी (शिरूर) व डिंभे (आंबेगाव)
७ कुकडी येडगाव, माणिकडोह येथील धरणे जुन्नर
८ भीमा चासकमान प्रकल्प खेड
वरील धरणांबरोबरच, मूलभूत सोयीसुविधांचा विचार करता पुणे जिल्ह्यात पुढील संस्था महत्त्वाचे कार्य करतात.
१. केंद्रीय जलशक्ती अनुसंधान शाला : (Central Water & Power Research Station) १९४५ पासून ही संस्था खडकवासला येथे कार्यरत आहे. धरणे, नद्या, पूल यांच्या प्रतिकृती या ठिकाणी बनवल्या जातात. पाण्याच्या प्रवाहाचा वेग व दिशा, देश -विदेशातील प्रकल्प, समुद्र किनारे, बंदरांची रचना, धरणे, भूस्तर, व भूकंप यांविषयी येथे संशोधन केले जाते.
२. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेऑरॉलॉजी, (वेधशाळा) पुणे : १९६२ साली पुण्यात स्थापन झालेल्या संस्थेत हवामान शास्त्राचा अभ्यास केला जातो. मोसमी पावसाचे व हवामानाचे पूर्वानुमान सांगण्याची महत्त्वाची जबाबदारी ही संस्था सांभाळते आहे. देशातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आर्वी येथे आहे. ‘विक्रम’ या नावाने ओळखले जाणारे केंद्र १९७१ पासून येथे कार्यरत आहे. तसेच खोडद येथे एक मोठी अवकाश दुर्बीणही आहे.
प्रशासन
तालुक्यांची लोकसंख्या व क्षेत्रफळ : (संदर्भ जनगणना २००१)
जिल्ह्यातील एकूण १४ तालुके असून त्यांची सूची पुढीलप्रमाणे
क्र. तालुका क्षेत्रफळ (चौ. कि. मी.) लोकसंख्या
१ जुन्नर १,४७०.७ ३,६९,८०६
२ आंबेगाव १,१०८.६ २,१३,८४२
३ शिरूर १,६२०.३ ३,१०,५९०
४ खेड १,४५४.३ ३,४३,२१४
५ मावळ १,१४४.३ ३,०५,०८३
६ मुळशी १,०१०.४ १,२७,३८५
७ हवेली १,१३४.२ १३,५३,०५०
८ पुणे शहर ४५७.१ २६,९५,९११
९ दौंड १,३८१.२ ३,४१,३८८
१० पुरंदर १,१८३.७ २,२३,४२८
११ वेल्हा ५३२.० ५५,८७४
१२ भोर ८७३.४ १,७१,७१९
१३ बारामती १,३८६.४ ३,७२,८५२
१४ इंदापूर १,५५७.६ ३,४८,४१३
जिल्ह्यातील नागरी प्रशासनाची व स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती पुढील कोष्टकात दिलेली आहे.
क्र. तपशील संख्या नावे
१ महानगरपालिका ०२ पुणे (१४४ प्रभाग), पिंपरी - चिंचवड (१०५ प्रभाग)
२ नगरपालिका ११ बारामती, सासवड (पुरंदर), दौंड, इंदापूर, शिरूर, जुन्नर, भोर, लोणावळा, तळेगाव- ढमढेरे, जेजुरी, आळंदी.
३ पंचायत समित्या १३ बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर, शिरूर, जुन्नर, भोर, हवेली, खेड, आंबेगाव, वेल्हा, मुळशी, मावळ.
४ ग्रामपंचायती १४०३ --------
राजकीय संरचना -
लोकसभा मतदारसंघ ( ४ ) : पुणे ,बारामती,शिरुर व मावळ. (मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड, पिंपरी या विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.)
विधानसभा मतदारसंघ (२१) : जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, मावळ, चिंचवड, पिंपरी , भोसरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कँटॉन्मेंट व कसबा पेठ.
जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
शेती-
जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारची मृदा (जमीन) आढळते. पश्र्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता वाढत जाते. पूर्वेकडील बारामती व इंदापूर तालुक्यांत काळी जमीन प्रामुख्याने आढळते.
जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पिकांचा तपशील व सिंचनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
क्र. तपशील क्षेत्र (हेक्टर्स)
१ लागवडीखालील जमीन ९९८५२२
२ जिरायत ७५६११८
३ बागायत २४२४०४
क्र. हंगाम महत्त्वाचे पीक
१ खरीप बाजरी, तांदूळ
२ रब्बी गहू, हरभरा
३ खरीप व रब्बी ज्वारी
ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. ‘आंबेमोहोर’ हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
पुणे जिल्ह्यात एकूण ११ साखर कारखाने आहेत. त्यांची सूची पुढे दिली आहे.
क्र. कारखान्याचे नाव गाव, तालुका
१ श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना शिरोली, जुन्नर
२ संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना हिंजवडी, मुळशी
३ राजगड सहकारी साखर कारखाना निगडे, भोर
४ घोडगंगा सहकारी साखर कारखाना न्हावरे, शिरुर
५ भीमा सहकारी साखर कारखाना मधुकरनगर, दौंड
६ सोमेश्र्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्र्वर, बारामती
७ माळेगाव सहकारी साखर कारखाना माळेगाव, बाराती
८ श्रीछत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर, इंदापूर
९ इंदापूर सहकारी साखर कारखाना बिजवडी, इंदापूर
१० यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर, हवेली
११ भीमाशंकर सहकारी साखर कारखाना अवसरी बुद्रुक, आंबेगाव
भारतीय एग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन (उरळीकांचन तालुका हवेली) व नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (पुणे शहर) या कृषिविषयक संस्थाही येथे कार्यरत आहेत.
उद्योग-
पुणे-मुंबई ही दोन राष्ट्रीय महत्त्वाची शहरे जोडणार्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे. पुणे शहर हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असलेल्या या जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण, हिंजवडी, रांजणगाव, कुरकुंभ, बारामती, जेजुरी येथे महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती आहेत.
पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे उद्योग पुढीलप्रमाणे आहेत.
क्र., उद्योगाचे नाव, उत्पादन, गाव, तालुका
१. इन्फोसिस व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अन्य कंपन्या सॉफ्टवेअर स्व. राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पार्क, हिंजवडी, मुळशी
२. टेल्को, फिलिप्स, किर्लोस्कर, क्रॉम्प्टन ग्रीव्हज... इ. मोटारी, इंजिने,..इ पिंपरी, चिंचवड
३. अपोलो टायर्स, व्हर्लपूल टायर, रेफ्रीजरेटर रांजणगाव, शिरूर
४. प्रामुख्याने मेकॅनिकल उद्योग मेकॅनिकल पार्टस् भोसरी, हडपसर
५. में?
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
411030