Harshada Writes

Harshada Writes

Share

08/03/2026

स्त्री: एक स्वाभिमान

कुठे चाललाय पुरुषार्थ तुमचा, जिथे पदरी फक्त अपमान आहे?
लक्षात ठेवा, जिथे स्त्रीचा मान नाही, तिथे लक्ष्मीचा ना वास आहे.
घर कष्टाने ती सावरते, स्वप्नांची होळी करून,
आणि तुम्ही तिलाच लेखता, पायाखालची धूळ म्हणून?
शिवीगाळ आणि तोच तो तोरा, हा कसला तुमचा मोठेपणा?
मोलकरीण नाही ती घराची, ती तर घराचा खरा कणा!
रांधा, वाढा आणि मागे-पुढे करा, एवढीच तिची ओळख उरली?
तिच्या कष्टाची अन त्यागाची किंमत, तुमच्या नजरेत कवडीमोल ठरली?
पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून, ती आभाळ आज कवेत घेतेय,
पण घराच्या चार भिंतीत मात्र, ती आजही हुंदके देतेय.
तिच्या सहनशीलतेला दुबळेपणा समजण्याची चूक करू नका,
सन्मान देऊ शकत नसाल, तर अपमान करण्याचा हक्क घेऊ नका.
आज जागतिक महिला दिन, फक्त शुभेच्छांचा पाऊस नको,
तिला माणूस म्हणून जगू द्या, तिच्यावर जाच नको.
जिथे स्त्रीचा आदर होतो, तिथेच सुखाचा उजेड पडतो,
तिच्या स्वाभिमानाचा सन्मान करा, तेव्हाच हा दिवस सार्थ ठरतो!

- हर्षदा

07/03/2026

गीत : “भीमाने दिलेली उजेडाची वाट”

कधी होती बेडी रुढींची भारी
मनुस्मृतीच्या सावलीत दुनिया सारी
नव्हता आवाज, नव्हती ओळख
स्त्रीचा संसार होता फक्त वेदनांचा लेख

ना शिक्षण, ना स्वप्नांची आस
घराच्या चौकटीतच संपायचा श्वास
तुटलेल्या पंखांनी जगायची ती
अंधाऱ्या रात्रीत हरवायची ती

भीमाने दिली उजेडाची वाट
हक्कांची दिली नवी सुरुवात
शिका, लढा, संघटित व्हा म्हणाला
स्त्रीला स्वाभिमानाचा हक्क दिला

आज का विसरतो आपण ते दान
ज्याने दिला समानतेचा मान
भीमाच्या विचारांचा धरू या हात
महिलांसाठी पुन्हा उजळू दे वाट

विधवांना दिला जगण्याचा हक्क
शिक्षणाची उघडली ज्ञानाची खिडकी
कायद्यांत दिला समानतेचा मान
स्त्रीही आहे समाजाचा अभिमान

हिंदू कोड बिलाची पेटवली ज्योत
नव्या जगाची उघडली वाट
बंधनांच्या त्या साखळ्या तुटल्या
भीमाच्या शब्दांनी दिशा बदलल्या

भीमाने दिली उजेडाची वाट
हक्कांची दिली नवी सुरुवात
शिका, लढा, संघटित व्हा म्हणाला
स्त्रीला स्वाभिमानाचा हक्क दिला

आज पुन्हा का जुन्या रुढींचा भार
का विसरलो आपण भीमाचा विचार
मनुस्मृतीच्या त्या सावल्या काळ्या
का पुन्हा येतात आयुष्यातल्या

महिला दिनी करू या प्रण
भीमाच्या विचारांचा धरू चरण
समानतेची ज्योत पेटवू पुन्हा
हीच खरी आदरांजली त्यांना

भीमाने दिली उजेडाची वाट
स्वातंत्र्याची दिली नवी मात
महिला शक्ती जागी हो आज
भीमाच्या विचारांनी बदलेल समाज

---- हर्षदा ❤️

Want your public figure to be the top-listed Public Figure in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address

Mumbai